मला प्राव्हसी पाहिजे
नमिताचे लग्न होऊनही आता ५-६ महिने होऊन गेले होते. सुरुवातीला छान छान वाटणारे, हवेहवेसे असणारे वातावरण आताशा तिला आवडेनासे झाले होते. काहीतरी नकारात्मक वाटू लागले होते. घरातल्या कुणाचेच वागणे तिला पटत नव्हते, चिडचिड होत होती पण नक्की शब्दात सांगता येत नव्हते कि कुणाचे काय चुकते. तिला आधी वाटले कि आपलीच दृष्टी चुकलीये, आपणच बदलले पाहिजे वगैरे.. पण तिला तरीही आपण काय आणि कसे बदलावे ते समजेना.
ती एक-दोनदा तिच्या आईशी बोललीही पण सांगितले ना... शब्दात सांगताच येत नव्हते नीट, त्यामुळे नक्की काय चुकीचे वाटतंय ते बोलताच येईना तिला.
वरवर पाहता अभयचे वागणे-बोलणे एकदम नेहमीसारखे होते. बाहेर फिरणे, मित्र-मैत्रिणी अगदी बेडरूममधील जीवनही छानच चालू होते. तिला त्याच्या वागण्याबोलण्यात चूक काढता येत नव्हती. मग तिने शांतपणे स्वतःचे वागणे तपासले. त्यात तर सगळीकडेच काहीतरी बिनसले दिसत होते, रागराग येत होता...
बराच वेळाने तोच तोच विचार केल्यावर तिला समजले कि तिच्या मनाप्रमाणे घडत नव्हते म्हणून ती चिडत होती.
:
नमिता शांत झाली. आपल्या मनाप्रमाणे काय घडत नाहीये, आपल्याला कसे घडायला हवे आहे.... ह्याचा ती जास्तीत जास्त विचार करू लागली. मग तिने ठरवले, जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो, आवडत नाही, घडलेले मनाप्रमाणे नाही असे वाटतंय तेव्हा तो प्रसंग मोबाईलवर टेप करून ठेवायचा. मग तिने तसे काही घडले कि लगेच मोबाईलवर ऑडिओ करून ठेवायला सुरुवात केली. आठवडाभर ते ऑडिओ अजिबात ऐकले नाही. नुसतेच टेप करून ठेवले.
:
आज नमिताने वेळ काढून सगळे ऑडिओ ऐकले. भराभर काही नोट्स काढल्या आणि त्या वाचल्या. तशी नमिता हुशारच हो, आठवी ते दहावीचे क्लास चालतात तिथे इंग्लिश आणि गणित शिकवायची. आठवड्यामध्ये दोनवेळा संध्याकाळचे क्लास, शनिवार-रविवार सकाळी बॅचेस असायच्या आणि सुट्टीमध्ये जास्तीचे क्लास. अभयने तिला स्वतःचे क्लास काढायलाही सुचवले होते पण 'जरा सेट झाल्यावर विचार करिन..' असे मोघम उत्तर तिने दिले होते. क्लासच्या निमित्याने बाहेर पडता यायचे, वेगळ्या मैत्रिणी, विद्यार्थी भेटायचे. बंगल्यातच क्लास सुरु केले तर घर आणि क्लास वेगळे राहणार नाही. क्लास चालू असताना आत जाऊन कुकर लावला, भाजी परतून आली असे होत राहणार... ते तिला नको होते. लगेच वेगळी जागा घेऊन क्लास सुरु करायचे तर इतकी इन्व्हेस्टमेंट करता येईल इतके विद्यार्थी मिळायला हवे... वगैरे!
:
नमिता घरी आली तेव्हा सासूबाई चहा करत होत्या. नमिता टेबलवर येऊन बसली.
"काय गं, शांत का? दमलीस का आज?"
"हम्म..."
"चहा घे गरम गरम आणि पड जरा..."
नमिता काहीच बोलली नाही. शब्दांची जुळवाजुळव करत राहिली.
सासूबाईंनी सासऱ्यांना बाहेर गॅलरीमध्ये चहा नेऊन दिला. सासूबाईंनी नमिताला चहा दिला आणि त्याही खुर्चीत बसून चहा घेऊ लागल्या.
"आई, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे."
'काय झालं ग, बोल ना..."
"तसं झालं काहीच नाही पण मला तुमच्याशी असं काही बोलायचं आहे जे तुम्हाला कदाचित पटणार नाही."
"असू दे, पटतंय का नाही ते नंतर ठरवूयात, आधी सांग तर खरं.."
"आपण दोघी बाहेर जाऊयात का बोलायला... म्हणजे मला जरा अजून मोकळेपणाने बोलता येईल?"
"बाहेर? म्हणजे कुठे?"
"मी ठरवते कुठे ते. उद्याच सकाळी जाऊयात.... कोणाला जास्त काही बोलू नका. मला आधी फक्त तुमच्याशीच बोलायचे आहे."
"बरं बाई, तू म्हणशील तसं..."
:
सासूबाईंना घेऊन नमिताने सरळ सारसबाग गाठली. देवदर्शन झाल्यावर बागेमध्ये दोघीजणी बेंचवर बसल्या. बागेत फारशी गर्दी नव्हतीच.
"आई, मी आज जे काही बोलेन ते ऐकल्यावर ते चुकीचे आहे किंवा मी वाईट आहे, असे समजून घेऊ नका. मला माझी बाजू मांडायची आहे. कदाचित मी चुकीची असेलही... पण मला समजून घ्या. मला अभयसोबत संसार करायचा आहे, तुम्ही दोघेही हवे आहात पण...."
"नमिता, तुझ्या मनात जे काही आहे ते बोल. मी गैरसमज करून घेणार नाही. मलाही लग्न झालेली मुलगी आहे. हे वय, लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ अवघड असतो, वळणावळणाचा असतो. आपले घर सोडून एका नवीन घरात रहायचे, त्याला आपले म्हणायचे अवघडच असते. मलाही माहिती आहे."
नमिता क्षणभर थांबली. तिने दीर्घ श्वास घेतला. ती सावकाश एक एक शब्द बोलू लागली.
"मला असं वाटतंय कि आपल्या घरात आपण चार माणसे आहोत. प्रत्येक कपलला वेगळी रूम, म्हणजे बेडरूम आहे पण तरीही मला हवी तशी प्राव्हसी मिळत नाहीये. लग्नाआधीचे माझे जीवन आणि आताचे, ह्यात नक्कीच फरक आहे, मी तशी तुलना करत नाहीये पण तरीही...
आता पहा, सकाळचा चहा हा मला फक्त अभयसोबत प्यायचा असतो. ती वेळ म्हणजे आम्हाला दोघानांही मिळणारा 'जरासा' मोकळा फ्रेश वेळ आहे. आजच्या दिवसातील काही मला त्याला किंवा त्याला मला सांगायचे असेल किंवा पेपरमधील एखादी बातमी वाचून दाखवायची असेल किंवा मोबाईलवरील फॉर्वर्डवर बोलायचे असेल.... पण चहालाही आपण सगळे एकत्र बसतो. मग आमचा वेळ नसतो तो 'आपला' असतो.. आणि दिवसाची सुरुवातच अशी आपली झाली कि माझी चिडचिड व्हायला लागते.
अभय ऑफिसला जातो तेव्हा मी घरीच असते. त्याला बाय करायला मी जेव्हा गॅलरीत जाते तेव्हा तुम्हीपण त्याला बाय करायला येता. मग आमचा नजरेचा खेळ संपतो. मी पटकन घरात निघून येते.
मला मान्य कि इतके दिवस तुम्ही तो निघताना त्याला पाकीट, चावी ह्याची आठवण करत होतात पण आता मी आलीये ना.. आता मला संधी द्या! मला करू दे आठवण. बाय न करताच... मी रूममध्ये जाते आणि चिडचिड करते. शांत झाल्यावर बाहेर येते. मला हे आवडत नाही, हे तुम्हाला सांगायचंय.
मलाही स्वयंपाक जमतो, करता येतो. प्रत्येक गोष्ट अशी कर, तशी कर मला सांगू नका. मी चुकेल पण त्यातूनच शिकेल. मला माझे-माझे असे काहीसे करून अभयला खायला घालायचे आहे. तुम्ही जसे करता तसे नाही. ती तुमची पद्धत, तुमची चव.. मला माझे वेगळेपण जपू दे. कधीतरी मलाही तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या हाताचे खावेसे वाटेल, तेव्हा तुमची पद्धत! हे सांगायचंय मला.
मला काही काही पदार्थ अजिबात जमत नाही म्हणजे ह्याआधी केलेही नाहीत. तुम्ही मला ते शिकवतपण नाहीत. मी पुस्तक, TV, youtube इथून शिकू शकते पण त्यामुळे 'तुम्ही शिकवले' असे मी कधीच म्हणणार नाही. माझी तयारी आहे पण तुम्हालापण तशी इच्छा असेल तर तुम्ही मला ते शिकवा जसे कि ढोकळा, हिरवी कैरीची चटणी, आप्पे वगैरे. मला आवडते म्हणून तुम्ही मी घरी नसतानाच करून ठेवता. तसे करू नका, मला ते आवडत नाही आणि मी मनात मार्क करून ठेवते कि आजपण ह्यांनी मी नसताना पीठ केले, आप्पे केले पण मला शिकवले नाही.
अजून एक, तुम्ही स्वयंपाक करणार असाल तर मी तुम्हाला हाताखाली लागते. चिराचिरी करायला, हे आण, ते कर सांगायला.. पण मी करणार असेल तर तुम्ही बाहेर जाऊन बसता. माझ्या मदतीला कोणीच नसते. मला तेव्हा खूप राग येतो. मी चिडून अभयला मदतीला बोलावले तर बाबा मदतीला येतात. मग माझी अजूनच चिडचिड होते. मलाही मदत हवी असते, तुम्हाला जमेल तशी मदत करा पण बाहेर जाऊन बसू नका. स्वयंपाकघर दोघींचे आहे. ते शेयर करायला लागणार म्हणजे वाईट वाटणार किंवा आवडणार नाही पण त्यात आनंद वाटला पाहिजे, असे काहीतरी दोघी मिळून करूयात. उगाचच डब्याच्या जागा एकदा मी आणि एकदा तुम्ही बदलून काही होणार नाही.
मी काहीही कपडे, भाजी, कप-बशी अगदी अभयसाठी माझ्या आवडीचा शर्ट आणला कि तुम्ही पहिल्यांदा 'आवडले' असे म्हणत नाही. तुम्ही 'छान आहे' म्हणायला वेळ घेता पण तुम्ही काही आणले तर तुमची अपेक्षा असते कि जगातली सर्वात भारी तुम्ही आणले आहे, अशी प्रतिक्रिया द्यावी. मला हे जमत नाही आणि तुमच्या प्रतिक्रियेचा रागही येतो. कप काय केव्हातरी फुटणार किंवा शर्ट जुना होणार पण ह्या आठवणी मात्र कायम मनात राहणार. तेव्हा अश्या आठवणी आपण कमी करूयात.
आम्ही बाहेर जाताना कधीकधी कारने जातो. तेव्हा मागच्या सीट्स रिकाम्या असणार आणि रिकाम्याच राहू दे. प्रत्येकवेळी तुम्ही सोबत आलेच पाहिजे, असे नाही. माझा मूड जातो, बाहेर जायची इच्छा संपते. अभयशी बोलायची तर संपतेच संपते. आम्ही उगाच काहीतरी इकडचे तिकडचे बोलत राहतो नाहीतर गाणी लावतो आणि मुक्याने प्रवास करतो.
रात्री आम्ही TV पाहत बसतो तेव्हा तुम्हीपण 'झोप येत नाही' म्हणून आमच्यासोबत TV पाहता. मग मी उठून जाते. आम्ही इंग्लिश सिनेमा पाहत असलो तर तुम्हाला तो समजतही नाही. तुम्ही "काय रे, काय म्हणाला तो, का हसलात तुम्ही..." असे काहीसे विचारत राहता. मला ते पण आवडत नाही. सिनेमामध्ये काही सिन असे असतात कि तुम्ही असताना ते आम्हाला पाहता येत नाही. इतरवेळी तुम्ही तुमच्या मराठी सिरीयल आमच्यावर लादता, पण हा 'TV टाईम' आम्हाला एन्जॉय करू दे.
:
नमिताने असे पुष्कळ काही सांगितले जिथे तिची चिडचिड वाढत असायची, राग यायचा आणि मग पर्यायाने ह्या घरचाच राग यायला लागायचा, मनाची शांतता ढासळायची. सर्व काही सांगितल्यावर तिला एकाचवेळी अपराधी आणि भय वाटले. तरीही आपल्या सासूबाई मनाने चांगल्या आहेत, हे तिला माहिती होते. त्या नीट विचार करतील, तिचे म्हणणे लक्षात घेतील ह्याची तिला खात्री होती.
एक-दोन दिवस शांततेमध्ये गेले. त्यांनी ना अभयला काही सांगितले ना तिच्या सासऱ्यांनाही !
नमिताला त्यांच्याबद्दल एक आत्मविश्वास आला.
पण हळहळू बदल घडत गेले.
एक दिवस त्या आणि सासरे सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडले. नमिता आणि अभयचा पहिला चहा झाल्यावरच आले. मग हे रोजचेच झाले.
अभय ऑफिसला निघताना सासूबाईंनी भाजी निवडत असतानाच त्याला बाय केले. नमिता एकटीच गॅलरीमध्ये बाय करायला गेली. परत आल्यावर ती सासूबाईंकडे पाहून हसली. त्यांनाही त्याचा अर्थ समजला आणि त्यांनी समाधानाने मान डोलाविली.
स्वयंपाकघरातले बदलही नमिता टिपत होती. रविवारी इडली करायची ठरले तर शुक्रवारी सासूबाईंनी नमिताकडून पीठ भिजवून घेतले. पीठ हलके होण्याच्या २-३ टिप्स सांगितल्या.
नमिताच्या मैत्रिणीचे डोहाळजेवण केले तेव्हा तर सासूबाई नमिताच्या हाताखाली लिंबूटींबू मदतीला थांबल्या. त्यांनीही कबूल केले कि आज त्यांना खूप गंमत वाटली अशी मदत करायला. नमिताच्या स्वयंपाकाचे त्यांनी कौतुकही केले.
नमिताची चिडचिड हळूहळू कमी झाली.
सासूबाईंचे आणि तिचे संबंधही सुधारले. अभयबरोबरही वागण्यात मोकळेपणा आला.
ह्याचा परिणाम म्हणजे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी नमिताने अभयच्या कानात गुडन्यूज दिली.
© सौ आरती अत्रे-कुलकर्णी
माझे पान या facebook page वरून

घटस्फोट - सौ आरती अत्रे-कुलकर्णी
अगदी ठरलेल्या वेळी दारावरची बेल वाजली. तसंही अमेरिकेमध्ये आल्यापासून वेळ पाळायची, हे रक्तातच भिनले होते. त्याने दार उघडले तशी ती आत आली आणि सोफ्यावर बसली.
"पाणी हवंय?" त्याने विचारले.
"नको..." ती शांतपणे म्हणाली.
"रवी, आज तू काही बोलायच्या आधी मला तुझ्याशी बोलायचे आहे. म्हणजे आता मी तुला घटस्फोट देणारच आहे आणि आपले कागदी नाते तसेही कागदानेच संपणार आहे पण त्या आधी एकदा मला माझ्या मनातील विचार तुला सांगायची संधी दे. प्रॉमिस, मी शांतपणे बोलेन, ओरडणार/चिडणार नाही."
"बोल" रवीच्या मूडचा अजूनही तिला अंदाज येत नव्हता.
"रवी, आपले पाहून-ठरवून अगदी कांदा-पोहे स्टाईलने लग्न झाले. तुझ्या, माझ्या आईवडिलांच्या साक्षीने. त्यालाही आता १७-१८ वर्षे झाली. बघ ना, नीरजच १५ वर्षाचा झाला. मी जेव्हा लग्न होऊन तुमच्या, म्हणजे आता आपलं म्हणण्यात काहीच अर्थ नाही म्हणून तुमच्या, तर तुमच्या घरी आले तेव्हा वयाने, अनुभवानेही मी लहानच होते. तू नक्कीच मला अनेकवेळा सांभाळून घेतलं, समजावलं. वयानुसार मी थोडी चिडकी, पटकन ऍडजेस्ट न करणारी, कामाची चाल-ढकल करणारी होते... म्हणजे असेल असे मला वाटते. तरीही तू खूप सांभाळून घेतलेस हे नक्की. कारण तेव्हा आपल्यात फारशी भांडणे झालीच नाहीत.
मला आठवतात ती भांडणे म्हणजे तुझी आई आणि मी, खूप भांडायचो. अनेक कारणे होती.. हा डबा इथेच का ठेवला, काचेची भांडी बाईला का घासायला दिली, घरात पॅन्ट का घातलीस, संध्याकाळी पुन्हा केर का नाही काढलास.... आता नीटशी आठवणार पण नाही मला. खूप वर्षे झाली नाही त्या गोष्टींना? एव्हडे करून त्या पुन्हा पुन्हा तारस्वरात मला सांगायच्या "रवीला कळलं नाही पाहिजे दिवसभर मला काय त्रास होतो ते, मी बापडी तुझं सगळं सहन करते पोराकडे पाहून" मला तर कळायचंच नाही कि सहन कोण करत ते... त्या कि मी? कधी नीटसा धीरहि झाला नाही ह्यातले काही तुझ्यापर्यंत मन मोकळे करून सांगायचा.
त्यातून तुझा धाकटा भाऊ मतिमंद, तरीही तुझ्याकडे पाहून मी हे लग्न केले कारण तू खूपच समंजस होतास, पहिल्यापासूनच. आणि लग्न ठरतानाच तू सांगितले होतेस कि भावाची कोणतीच जबाबदारी किंवा काम मला करावे लागणार नाही. त्याची खोली, त्याची कामे, त्याचे सगळेच वेगळे असेल. खरंच, अगदी तू सांगितले होते तसेच घडले. मला त्याचे कोणतेच काम करावे लागले नाही पण आपल्या संसारामध्ये त्याची छाया सतत होती. तुझ्या कितपत लक्षात आले मला माहिती नाही पण... तो जेवला का, तो उठला का, त्यांनी गोळ्या घेतल्या का, त्याचे काम करणारी बाई आली का...हे सगळं तू जातीने पहायचा. वेळप्रसंगी तू स्वतःही करायचास. तू कधी माझ्याकडून अपेक्षा केली नाही किंवा बोलूनही दाखवले नाही. पण त्याचे एखादे काम मला कोणीही न सांगताच मी केले तर तू त्यावेळी माझ्यावर जास्तच प्रेम करायचास, तुझ्याही नकळत. मग मी पण उत्साहाने त्याची काही कामे माझ्या जबाबदारीने करू लागले. तूला वाटले असेल मी घरामध्ये रुळले पण तुझे नवे नवे प्रेम हवेहवेसे होते म्हणून मी करत राहिले.
लग्नानंतर २-३ वर्षाने नीरज झाला. मला खूप भीती वाटत होती कि नीरजही तुझ्या भावासारखाच होईल का?. पण तसं झालं नाही. कधी कधी मला वाटते, तुझ्या आईला आणि तुलाही ती भीती होतीच पण मला तुम्ही कोणी उघडपणाने बोलला नाहीत. नीरज मोठा होऊ लागला तसे माझ्यामागचे त्रास अजूनच वाढले. तुझी आई नीरजला ताब्यात घेऊन बसायची. आई म्हणून मला काहीच हक्क नव्हता नीरजवर, तो तुझा मुलगा होता त्यांच्याठायी. मी फक्त एक माध्यम...त्याला जन्माला घालायचं. खूप इच्छा,स्वप्ने होती रे माझीपण...पण नीरज तिथे होतो तोवर आजीकडेच राहिला.
आणि तेव्हाच तुला अमेरिकेचे प्रोजेक्ट मिळाले. आधी तू एकटाच आला. मी अगदी जीवावर दगड ठेऊन तुला पाठवलं कारण पुढे-मागे मीपण इथे तुझ्यासोबत येईन आणि माझ्यामागची कटकट संपेल, असे वाटून. मग आज इतक्या वर्षाने माझ्या पुढ्यात काय मांडून ठेवलंय ते मला तेव्हा कुठे माहिती होतं? तू नसताना ते दिवस मी अक्षरशः रडत, मोजत काढले तिथे.
असो, तुझ्यासोबत वर्षभरातच मी पण इथे आले. नवीन देशात मी जास्त मोकळी झाले, स्वतंत्र झाले, नोकरी सुद्धा करू लागले. आणि इथेच चुकत गेले माझे. 'स्वतंत्र होणे' ह्याचा वेगळा अर्थ लावला का मी? माझ्या मूळ स्वभावाला बदलून/विसरून वागले का मी? पार्टीमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये सहज तुझ्यावर 'हक्क' गाजवायला लागले. हक्क आणि प्रेम फार फार वेगळे असतात रे...'सोडून दिले आणि पुन्हा परत आले तर ते प्रेम', असे म्हणतात. मी सोडूनही दिले नाही. चार लोकात तुझ्यावर रुबाब करायची, आवाज चढवायची, तुला मुद्दामून कामे सांगायची....तुझ्यावर कारण नसताना संशयदेखील घ्यायला लागले. घरी आल्यावर भांडणे, चिडचिड, आदळआपट सुरु झाली. अश्याने तू पार्टीमध्ये येईनासा झालास, घरीच राहू लागला. पण मला जायचे असल्याचे. मी तुझ्या मागे लागायची, विनवायची. छोट्या नीरजला आवरून तुला सांगायला पाठवायची. तू यायचास.... पण शेवट बदलायचा नाही. संशय फार वाईट, रवी. त्यानेच मी तुला उध्वस्त केलं आणि स्वतःही झाले. तुझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे तुझे लफडे म्हणून पहायला लागले. तुझा मूळचा स्वभावच मदत करण्याचा आहे, सावरून घेण्याचा आहे आणि मी त्याला तुझे लैगिंक आकर्षण समजत गेले. माझ्या मनाच्या आलेखावर अनेक स्त्रियांसोबत तुझी चित्रे रंगवली. तुला बीभत्स चित्रित केले.
तू एक नवरा म्हणून खूप चांगला होता, आहेस. मला नेहमी साथ देणारा, मदत करणारा, चुकले तर समजावून घेणारा. बहुतेक... माझ्याच काही चुका इतक्या मोठ्या झाल्या आणि तू ह्या निर्णयावर आलास कि आपण वेगळे होणे उत्तम. मागच्या ४-५ वर्षात आपली भांडणे, मतभेत इतके विकोपाला गेले कि आता ते साधूच शकत नाही पुन्हा. नीरजही मोठा होतोय तेव्हा अजून तमाशा न करता मार्ग बदलावे, हे तुझे म्हणणे खरे.
रवी, इथे येण्याआधी कितीही नाही म्हणले तरी घरातील मोठ्या माणसांची बंधने होती मला. वागता-बोलताना त्यांचा नकळत आदर केला जायचा. घरात सोबत रहातात म्हणून त्यांची मते विचारली जायची, परवानगी घेतली जायची. अगदी माझे आई-बाबा देखील चुकले तर ओरडायचे मला. पण इथे आल्यावर मोठे माणूसच राहिले नाही माझ्यावर बंधन ठेवायला. तू तसाच स्थिर होतास पण मी वहावत गेले. तिथेही नीराजला घरी ठेऊन जायचोही बाहेर आपण पण इथे आल्यावर काहीवेळेला मला नीराजही ओझे वाटू लागला आणि तू हादरलाच. बाहेर जायची, मिरवायची माझी ओढ जबरदस्त होती. कदाचित लग्नानंतर पहिल्या काही वर्षात मला असे काहीच करता आले नाही म्हणून उफाळून बाहेर येत राहिले.
तू मला डॉक्टरकडे नेलेस, थेरपी केली,औषधोपचार झाले पण आत आत मनाच्या तळाला खूप काही चिकटलेले, इतक्या वर्षात साचलेले, अपूर्ण असे काहीसे पूर्णपणे बाहेर आलेच नाही. हळूहळू मी कोलमडत गेले. मानसिक आजाराची शिकार झाले आणि बंदिस्त राहू लागले. आता फक्त तूच एकमेव व्यक्ती अशी होतास जो मला डोळ्याला दिसत होता. ना घरी कोणी येत होते ना मी कुठे जाण्यासारखी वागत होते. त्यातूनही सावरले. तुझ्यामुळे सावरले पण तरीही तू वेगळे होण्याचे ठरवलेच. मी चिडले, पुन्हा पुन्हा तुलाच दोष राहिले. खरंच का मी तुला छळले? तुझ्याइतकीच मी पण नाही का भरडले गेले? तुला शांतता हवी म्हणून मला दूर करतोस पण काहीवेळेला वाटते तू काय आणि मी काय, आतमध्ये अशांतच आहोत आणि अशांतच राहणार.
मला तुझ्या आईबद्दल प्रॉब्लेम्स, तुझ्या भावबद्दल अनास्था, नीरजचे आणि माझे फारसे जमलेच नाही कारण त्याच्या जन्मापासूनच तो माझ्यापासून दूर...आजीकडे. तू मात्र सगळीकडे... आई-भाऊ-मुलगा आणि मी पण. माझा एकटीचा कुठे नव्हतासच तू, पण हा देखील माझा प्रॉब्लेमच होता. इथे आल्यावरही तू लोकप्रिय. माझ्यापेक्षा तुझ्यामध्ये जास्त गुण...तुला चांगला स्वयंपाक येतो, तू नीरजकडे जातीने लक्ष देतोस, तू नोकरी-घर-मुलगा हे सांभाळून तुझे स्पोर्टलाईफ जगतोस. तू लोकांना मदत करतोस, धावतोस त्याच्या अडचणीच्या वेळी.
मी खूप मागे पडले तुझ्यापेक्षा म्हणून कदाचित तुझ्यावर संशय घेतला असेल का? तुला चार लोकात अपमानित करायला लागले का? तुझ्याशी भांडायला लागले का?
त्यातूनच आज आपण इथे पोहाचलो.
हि झाली आज मला काय बोलायचे त्याची पार्श्वभूमी. आता मी काय बोलते ते नीट ऐक. मला पुन्हा हे कोणाला सांगायचेही नाही आणि हा विषयही नकोय! पण आज बोलूदे मला.
जेव्हा तुझी आई आणि माझे संबंध खुपच ताणले गेले तेव्हा वाटायचे...ह्या गेल्यावर माझे आनंदाचे दिवस सुरु होतील. म्हातारं माणूस असे किती दिवस जगेल? त्यातून संधिवात आहे, मधुमेह आहे....अजून काही दिवसच! खरंच सांगते...मी असाही विचार केला होता तेव्हा. कधी कधी वाटे तुझा हा मतिमंद भाऊ, तो देखील असा कितीसा जगणार. तसेही अश्या माणसांचे वय कमीच असते. त्यातून जगणार नाही असे वाटून इतकी वर्षे जगला म्हणजे दिवस भरलेच त्याचे, कधीची जाईल. मग ती खोली आपण आपल्या बाळाला देऊयात. सगळे घर माझ्याच ताब्यात येईल. कोणाशीच भांडणे नाहीत, तंटे नाहीत, मतभेत नाही...आनंदच राहील फक्त. तेव्हा माझ्या मनात हा विचारही आला नाही कि एक दिवस आपणच दोघे भांडून वेगळे होऊ.
असो... आज तुझी आईही नाही आणि भाऊही नाही. खरंच आपण दोघे आणि आपलं बाळ. पण त्या घराची ओढ संपली, इथे आपले नवीन घर झालं. कधीतरी ३-४ वर्षाने एकदा तिकडे जातो.. तुला आता तिथे जायची ओढ संपलीच आहे, उगाच माझ्यासोबत येतोस.
रवी, ज्या त्रासात/कटकटींमध्ये मी माझे तरुणवयातले दिवस घालवले त्याचे मोल शून्य केलंस रे तू ह्या घटस्फोटाने. एक एक दिवस मी वाट पाहायची आपले प्रेमाचे दिवस येण्याची आणि तू एकदम वेगळं होण्यावरच येऊन थांबल्यास! आता नीराजही तिकडे यायला तयार नाही. मी इथे एकटी राहू शकते पण माझी इच्छाच नाही.
म्हणून हे सांगायला आले मी कि मी परत जाणार आहे. अवघड जाईल सुरुवातीला पण खूप विचार करून हा निर्णय मी घेतला आहे. तुला माहितीच आहे, माझ्या आई-वडिलांचे घर त्यांनी मला दिले आहे. कधी आले तर रहा इथे.."बालपणीचा काळ अनुभव परत" असे म्हणून. मी तिथेच राहीन. तसंही माझा भाऊ तिथे रहात नाही कारण ती जागा लहान आहे. आता मला एकटीला अशी किती जागा लागणार, पुरेल.
दुसरे म्हणजे घटस्फोटानंतर बायका आपले लग्नाआधीचे नाव पुन्हा लावतात कारण नवऱ्याचे नाव लावायचा अधिकार संपतो. पण माझी विनंती आहे कि मी यापुढेही तुझेच नाव आयुष्यभर लावेन. रवी, गेली १७ वर्षे मी हे नाव वापरतीये. नसानसात, रक्तारक्तामध्ये हेच नाव आहे. आता पुन्हा मला माझे माहेरचे नाव लावायला लावू नकोस. हे मागायला आले.
आणि शेवटचे, तिसरे मागणे - माझ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये गेली अनेक वर्षे शीतयुध्य चालूच आहे. ज्यापद्धतीने त्याने आई-वडिलांची शेवटच्या दिवसात हेळसांड केली ते मला अजिबात आवडलेले नाही. तुला आठवतं, आपल्याला समजले तेव्हा आपण तातडीने तिथे गेलो. त्यांना मोठ्या हॉस्पिटल हलवले पण तरीही बाबा गेलेच. डॉक्टर म्हणाले "लौकर आणले असते तर वाचले असते." त्यानंतर आईला इथे, अमेरिकेमध्ये घेऊन आलो पण तिने जगायचंच सोडून दिले आणि ती हि गेली. रवी, उद्या मला काही झालं तर माझ्यावर संस्कार करण्याचे हक्क मी तुला देणार आहे, अगदी कागदोपत्री.... कृपया ते स्वीकार.
माझं बोलून झालंय. तिकडे गेल्यावर माझा बदललेला फोन नंबर तुला पाठवीन. तसा तुझ्याशी कोणताच पत्रव्यवहार किंवा कारण नसताना संपर्क करणार नाही मी. पण जेव्हा करीन तेव्हा तू मदतीला येशील, ह्याची खात्री आहे. नीरजला तू सांभाळशीलच, त्याला ते ते सगळं देशील जे जे तो मागेल. यदाकदाचित तू घर बदललेस तर मला पत्ता पाठव.
हे घटस्फोटाचे कागद. मी सह्या केल्यात. पुढच्या मंगळवारी माझी फ्लाईट आहे. तोवर लीगल गोष्टीच्या बाबी पूर्ण होतील. माझी तुझ्याबद्दल कोणतीच तक्रार नाही, रवी. तू सुखी रहा." आसावरी उभी राहिली.
"आसावरी, तू तुझ्या मनातले स्पष्ट बोललीस, बरे वाटले. मी आलो भारतात तर नक्की तुला भेटत जाईल. नीरजबद्दलदेखील तुला सांगीन. तू सांगितलेले सगळे मान्य.....आपण वेगळे झालो ते पुन्हा सुखी व्हायला. तेव्हा माझ्याइतकीच तूसुद्धा सुखी हो." रवी शांतपणे म्हणाला.
गालावरून ओघळलेले डोळ्यातले पाणी पुसत मागे वळून न पाहता आसावरी बाहेर पडली.
:
तळटीप - काही कथा सुचल्या म्हणून लिहिल्या. काही कथा घडल्या म्हणून त्याला शब्दांकन केले. हि कथा घडलेली आहे.
मुळात हि कथा एका मानसिक स्थितीमधून जाणाऱ्या विवाहित पत्नीची आहे. तो कालखंड मोठा आहे, लग्न झाल्यापासून तिच्या मानसिक स्थितीमध्ये परिवर्तन होत गेले, अमेरिकेमध्ये आल्यावरही त्यात अनेक बदल झाले. मन मोकळे झाले नाही, मनासारखे झाले नाही तर ज्वालामुखी कोणत्याही स्वरूपात बाहेर पडतो...तसे तिचे काहीसे झाले आहे. अगदी घडलेली प्रत्येक गोष्ट, घटना स्पष्टपणे नाही सांगता येत आणि तरीही मनावर अनेक ओरखडे उमटवून जाते. तिचे अनेक मनात खदखदणारे प्रश्न, मानसिक गोंधळ दाखवणारी, मन असमतोल असणारी कारणे सांगितलेली आहेत.
Arti Atre Kulkarni,